Site icon Aapli Baramati News

मोठी बातमी : विरोधकांना नमवण्यासाठीच ईडीचा वापर; वेळ आल्यावर बघू : शरद पवार यांचा इशारा

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

ईडीकडून सुरू असलेल्या कारवायांबाबत शरद पवार यांनी त्यांच्या खास शैलीत भाष्य केले आहे. ईडीचा वापर हा विरोधकांना नमवण्यासाठीच केला जात आहे. मात्र काळ येतो आणि जातोही. त्यामुळे वेळ आल्यावरच सर्व त्या दुरुस्त्या केल्या जातील अशा शब्दांत ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे.

ईडीकडून राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर सत्ताधारी नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. याबाबत आज हडपसर येथील कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. अनिल देशमुख यांच्या प्रकरणावर बोलताना त्यांची कायदेशीर लढाई सुरू आहे. त्यावर भाष्य करणं योग्य नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

या देशात महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या संख्येने ईडीच्या केसेस वाचल्या का कधी?, एकनाथ खडसे, अनिल देशमुख, अनिल परब, प्रताप सरनाईक यांच्या विरोधात ईडीच्या कारवाया सुरू आहेत. विरोधकांना नमवण्यासाठी एक साधन म्हणून ईडीचा वापर केला जात आहे. ठिक आहे. काळ येतो आणि जातो. काळ जाईल तेव्हा त्यात दुरुस्त्या होतील अशा शब्दांत शरद पवार यांनी केंद्र सरकारला ठणकावले.

.. ईडीचा हस्तक्षेप हा तर राज्यांच्या अधिकारांवर गदा..!

गेल्या काही वर्षात देशातील लोकांना नवीन यंत्रणा माहीत झाली. या यंत्रणेचे नाव ईडी. ही ईडी कुणाच्या मागे कशी लागेल हे सांगता येत नाही. काल शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आल्या होत्या. त्यांच्या तीन शिक्षण संस्था आहेत. एक इंडस्ट्री आहे. या संस्थांचा व्यवहार 20-25 कोटींच्या आत आहे. त्यांना ईडी त्रास देत आहे. जिथे गैरव्यवहार झाला असेल तिथे चॅरिटी कमिशन आहे. ते शाळा कॉलेजचा व्यवहार पाहतात. राज्य सरकारचं गृहखातं आहे. आपल्याकडे खोलात जाऊन चौकशी करण्याचा अधिकार असलेल्या संस्था असताना ईडी तिथे जाऊन हस्तक्षेप करते ही राज्याच्या अधिकारावर गदा आहे.  या गोष्टी योग्य वाटत नाही. यावर येत्या अधिवेशनात संसदेत आवाज उठवणार असल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version