मुंबई : प्रतिनिधी
उत्तरप्रदेश राज्यातील लखिमपुर जिल्ह्यात शेतकर्यांच्या आंदोलनात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबरला राज्य सरकारने महाराष्ट्र बंदची हाक पुकारली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यावर झालेल्या हिंसाचारप्रकरणी चर्चा झाली. त्यानंतर सोमवार दि. ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात सत्तेत असलेल्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी लखिमपुर खेरी जिल्ह्यात झालेल्या शेतकरी हिंसाचाराच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देत निषेध व्यक्त केलेला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या प्रकरणावर पत्रकार परिषद घेत ही घटना जालियनवाला बाग हत्याकांडासारखी आहे असे म्हटले आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यासह अन्य नेत्यांनी घटनास्थळी जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपचा निषेध व्यक्त केला आहे. तसेच सेनेचे शिष्टमंडळ लखिमपुरला जाणार असल्याचे समजते.
आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत लखीमपूर हिंसाचारावर चर्चा करण्यात आली. या पार्श्वभूमीवर सोमवारी महाराष्ट्र बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदवला जाणार आहे. राज्यात सत्तेत असलेल्या तीनही पक्षांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. त्याचवेळी आता राज्यात बंद पाळून या घटनेचा निषेध केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.