पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळेच आपण राजकारणात आलो. मात्र अलीकडील काळात पक्षातील रिकामटेकड्या नेत्यांचा त्रास होवू लागल्यामुळे मी सर्व वस्तुस्थिती राज ठाकरे यांना सांगून पक्षाचा राजीनामा दिला असल्याचे रुपाली पाटील ठोंबरे यांनी आज स्पष्ट केले. कोणत्या पक्षात जायचे याबद्दल अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र त्याबद्दल लवकरच भूमिका जाहीर करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
काल रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. त्यानंतर आज त्यांनी माध्यमांसमोर येवून आपली राजीनामा देण्यामागची भूमिका स्पष्ट केली. मी गेल्या १४ वर्षांपासून मनसेमध्ये काम केलं आहे. मात्र काही स्थानिक रिकामटेकड्या नेत्यांकडून त्रास दिला जात होता. ही बाब आपण राज ठाकरे यांच्या कानावरही घातली. परंतु काही बदल होत नाहीत हे लक्षात आल्यानंतर मी स्वत:मध्ये बदल करायचा निर्णय घेऊन पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याचे रुपाली पाटील यांनी यावेळी सांगितले.
वास्तविक मला राजकारणात येण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडूनच प्रोत्साहन मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्या किंवा पक्षाच्या विरोधात बोलून इतरांसाठी भांडवल उपलब्ध करून देणं हे मला पटणारं नाही. त्यातूनच पक्षांतर्गत चालणाऱ्या सर्व बाबी राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवून मी पक्षातून बाजूला झाले आहे असे सांगून रुपाली पाटील यांनी राजीनामा देण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, युवा सेनेचे वरुण सरदेसाई यांची भेट घेतल्याचेही स्पष्ट केले.
कोणत्या पक्षात जायचे याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र माझ्या स्वभावानुसार जो पक्ष आपल्याला स्वीकारेल त्या पक्षात आपण प्रवेश करणार आहोत. या संदर्भात लवकरच निर्णय जाहीर करणार असल्याचेही रुपाली पाटील यांनी यावेळी सांगितले.