सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
पोलिसांसोबत वाद घातल्यामुळे माजी खासदार निलेश राणे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्राद्वारे कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याच्या प्रकरणातून भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर कणकवली पोलिस स्टेशनमध्ये संशयित म्हणून गुन्हा दाखल झाला होता. अटक टाळण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र या तीनही न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.
सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांना जिल्हा सत्र न्यायालयात शरण येण्यासाठी दहा दिवसांचा अवधी दिला होता. मात्र नितेश राणे २४ तासातच जामीन अर्जावरील सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाले होते. जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दहा दिवसांचा अवधी दिला असताना पोलिसांसमोर त्यांना अटक करायची की नाही, असा गोंधळ त्यांच्यासमोर उपस्थित झाला होता.
न्यायालयातून निघत असताना त्यांची गाडी पोलिसांनी अडवली. त्यावेळी निलेश राणे आणि नितेश राणे यांनी गाडीतून बाहेर येत पोलिसांना गाडी थांबवण्याचे कारण विचारले. त्यावर पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश असल्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवसांचा अवधी दिल्यानंतर पोलिस अडवणूक करत आहेत हा न्यायालयाचा अवमान नाही का? कोणत्या अधिकाराने तुम्ही गाडी थांबवली ते सांगा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यावर पोलिसांनी त्यांना सहकार्य करण्याची विनंती केली.
निलेश राणे यांनी पोलीसांना मोठ्या आवाजात दहा मिनिटांपासून उभा राहून सहकार्य करत आहे. कोणत्या अधिकाराखाली तुम्ही आमदाराला गाडीमध्ये बसवले ते सांगा? असा सवाल केला. या प्रकरणानंतर राणे बंधूनी पुन्हा वकिलांसोबत न्यायालय गाठले. या सर्व गोंधळानंतर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना पत्राद्वारे निलेश राणे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.
‘जमावबंदीचे आदेश असतानाही नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी सत्र न्यायालयाच्या बाहेर बंदोबस्तासाठी तैनात पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अरेरावी करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. याबाबत सखोल चौकशी करून निलेश राणे यांनी त्यांच्या समर्थकांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा,’ अशी मागणी या पत्रातून केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.