Site icon Aapli Baramati News

मोठी बातमी : नाशिकमध्ये मनसे स्वबळावर लढणार; भाजपशी युती नाही

ह्याचा प्रसार करा

नाशिक : प्रतिनिधी

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटीनंतर नाशिकमध्ये भाजप-मनसे एकत्र येणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र आता या चर्चा फोल ठरल्या असून नाशिकमध्ये मनसे स्वबळावर लढणार असल्याची माहिती मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

मनसेचे नेते अमित ठाकरे हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या दरम्यान माध्यमांशी बोलताना संदीप देशपांडे यांनी भाजपसोबत युतीच्या चर्चेला विराम दिला. अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कामबॅक करेल असा विश्वास देशपांडे यांनी व्यक्त केला.

गेल्या पांच वर्षात नाशिकमधील जनतेची पुरती निराशा झाली आहे. सत्ताधाऱ्यांनी केवळ लोकांना आश्वासने दिली. ती पूर्ण झालेली नसल्याचे संदीप देशपांडे यांनी नमूद केले. राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये पक्ष संघटनेत एकजूट करण्याच्या अनुषंगाने पावले उचलली आहेत. त्यातून नव्या-जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन नाशिक महानगरपालिका निवडणूक लढवण्यात येणार असल्याचेही संदीप देशपांडे यांनी सांगितले.  

दरम्यान, नाशिकमध्ये भाजप आणि मनसेच्या युतीबाबत कोणताही प्रस्ताव नाही. त्यामुळे मनसे स्वबळावरच लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मध्यंतरी राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीनंतर मनसे-भाजप एकत्र लढणार या चर्चेला आता विराम मिळाला आहे.  


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version