मुंबई : प्रतिनिधी
राज्यावरील कोरोनाचे संकट अद्याप कमी झालेले नाही. त्यातच तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची दाहकता मोठ्या प्रमाणात असून शकते. त्यामुळे केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आणि वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार महाराष्ट्रात केवळ दोनच दिवस पावसाळी अधिवेशन घेण्यात आले आहे. त्यामुळे अधिवेशन काळात वाढ करणे उचित ठरणार नसल्याचे रोखठोक उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भाजपच्या शिष्टमंडळाने भेट घेत विविध मागण्या केल्या होत्या. याबाबत कार्यवाही करून कळवावे अशा सूचना राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केल्या होत्या. त्यानुसार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र पाठवून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मागण्यांना उत्तर दिले आहे.
अधिवेशनाचा कालावधी वाढवावा या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रात सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. ते या पत्रात म्हणतात, विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक २२ जून रोजी पार पडली. या बैठकीत कोव्हीड-१९ मधील डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरीएंटच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील टास्क फोर्समधील तज्ञांनी व्यक्त केलेली चिंता आणि केंद्र सरकारने दिलेला सावधगिरीचा इशारा याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. त्यानुसार केवळ, ज्या कामकाज सल्लागार समितीला अधिवेशनाचा कालावधी ठरवण्याचा अधिकार आहे, त्याच समितीने कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून सन २०२१ च्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी दि. ५ व ६ जुलै असा दोनच दिवसांसाठी निश्चित केला आहे.
राज्यामध्ये सध्या असलेली कोरोनाची दुसरी लाट अद्यापपर्यंत ओसरलेली नाही. त्यातच तिसऱ्या लाटेचीही तीव्र शक्यता तज्ञांनी वर्तवलेली आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशात तिसऱ्या लाटेबाबत चिंता व्यक्त केलेली आहे. तसेच या लाटेच्या दाहकतेबद्दलही चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पावसाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवणे शक्य नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी या पत्रात नमूद केले आहे.