Site icon Aapli Baramati News

मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही : रक्षा खडसे यांचा आरोप

ह्याचा प्रसार करा

जळगाव : प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नसताना त्यांनी औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपये नुकसानीची मदत द्यावी असे मत व्यक्त केले होते.  आता मुख्यमंत्री असताना हा शब्द पाळायला हवा. परंतु त्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही असा आरोप खासदार रक्षा खडसे यांनी केला आहे.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय झालेल्या बैठकीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देत सत्तेत आल्यानंतर ते ही गोष्ट विसरल्याची टीका केली. रक्षा खडसे म्हणाल्या,  मुख्यमंत्री ज्या प्रकारे बोलतात, त्याप्रमाणे वागत नाहीत. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. मात्र या नुकसानाची सरसकट भरपाई राज्य सरकार देत नाही. नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर भरपाई देण्यात येईल असे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे.

राज्य सरकार शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करत आहे. थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांची वीज तोडू नका अशी विनंती मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादा भुसे यांना अनेकवेळा पत्र पाठवून केली होती. मात्र त्यांच्याकडून एकाही पत्राची दखल घेतलेली नसल्याचेही रक्षा खडसे यांनी सांगितले. उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या विरोधी असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी यावेळी केला.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version