Site icon Aapli Baramati News

मुख्यमंत्री पाहुण्यासारखे कोकणात येऊन गेले; कोकणी माणसांना काहीच दिले नाही : नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

ह्याचा प्रसार करा

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी  

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर टीका केली आहे.  मुख्यमंत्री पाहुण्यासारखे कोकणात येऊन गेले. त्यांनी कोकणी माणसाला काही दिले नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. ना कोणत्या विकासकामांसाठी निधी दिला ना कोणती योजना जाहीर केली. ते आले आणि तसेच गेले असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाचे लोकार्पण झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे एकाच व्यासपीठावर आले होते.  यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री आदिती तटकरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घेतले.

चिपी विमानतळाचे श्रेय माझे नाही तर कोणाचे आहे? असा सवाल करत राणे म्हणाले, पाहुणे नुसते येतात आणि निघून जातात. मात्र या सगळ्या पाहुण्यांपेक्षा मुख्यमंत्र्यांची भूमिका भयानक होती. मुख्यमंत्री आले आणि निघून गेले. मात्र विकासावर काहीच बोलले नाहीत. कोकणातील जनतेला काहीच दिले नाही. कोकणाने शिवसेना उभी केली, मात्र शिवसेनेने कोकणाला काहीच दिले नाही.

ठाकरे यांच्या भाषणाला मी भाषण मानत नाही. त्यांच्या भाषणात काहीच मुद्दे नव्हते. त्यांना आज भाषणाची लिंक लागली नाही. मुख्यमंत्र्यांनी भाषणात माझ्या कोणत्याच मुद्याला उत्तर दिले नाही.  त्यांचं एकही वाक्य पूर्ण नव्हतं. कोकणातली पूरपरिस्थिती आणि वादळाची थकबाकी आहे. त्यातील एक रुपया तरी दिला का?  हे त्यांनी सांगावे. विनायक राऊत यांनी विमानतळाला विरोध केला होता. हे मी सांगितल्यानंतरही ते काहीच बोलले नाहीत. त्यांनी थातूरमातूर भाषण केले आणि निघून गेले, असेही राणे यावेळी म्हणाले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version