पुणे : प्रतिनिधी
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविन दरेकर यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरेकर यांनी शिरूर येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करतांना महिलांबाबत विधान केले होते. दरेकरांना हेच विधान महागात पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवीण दरेकर हे शिरूर येथील एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेला गालाचा मुका घेणारा पक्ष आहे’ असे धक्कादायक विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण चांगले तापले होते. याबाबत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आक्षेप घेत दरेकरांच्या व्यक्तव्याचा समाचार घेतला होता.
दरेकर यांनी हे विधान लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर केले होते. हे वाक्य महिलांबाबत लज्जास्पद आहे, असा आक्षेप चाकणकर यांनी दरेकर यांच्यावर पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार हा गुन्हा नोंदवला आहे.