मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राची सत्ता हाती द्या, चार महिन्यात ओबीसी आरक्षणाचा मार्गी लावतो अन्यथा राजकारणातून संन्यास घेतो असे वक्तव्य करणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. देवेंद्र फडणवीस हे किती नाटकी आहेत हे महाराष्ट्राच्या जनतेला समजले आहे. त्यामुळे जनताच आता त्यांना राजकारणातून संन्यास देईल अशा शब्दांत नाना पटोले यांनी पलटवार केला आहे.
मुंबईतील टिळक भवनात पत्रकारांशी संवाद साधतांना कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास भाजपसह केंद्र सरकार आणि तत्कालीन फडणवीस सरकार कारणीभूत असल्याचा आरोप करून नाना पटोले म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने ओबीसीची आकडेवारी दिली असती तर आज अशी वेळच आली नसती. केवळ भाजपने हे होवू दिले नाही. आता मात्र ओबीसींचा कळवळा असल्याचे दाखवले जात आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वीही देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात पाच वर्षात त्यांनी आरक्षण दिलेच नाही. धनगर समाजाची घोर फसवणूक केली. ओबीसींबद्दलही हीच भूमिका घेतली गेली. मराठा समाजालाही आरक्षणाच्या नावाने झुलवत ठेवल्याचे सांगून नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलणारे मशीन असल्याचा घणाघात केला. खोटं बोल पण रेटून बोल हा फडणवीस यांचा स्वभाव असल्याचेही त्यांनी नमूद केले.