पुणे : प्रतिनिधी
आगामी महापालिका निवडणुकीसाठी सगळ्या पक्षांकडून हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही निवडणुकीची तयारी करण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मनसेने भाजपासोबत युती करावी, अशी मागणी मनसेच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे केली आहे.
सद्यस्थितीत मनसेचे पुणे महापालिकेत केवळ दोनच सदस्य आहेत आहेत. २०१२ मध्ये महापालिका निवडणुकीनंतर मनसेची मतांची टक्केवारी घसरत आहे. २०१२ साली झालेल्या निवडणुकीमध्ये मनसेने २९ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये मनसेने केवळ दोनच जागा जिंकल्या आहे. जर सत्तेत जायचे असेल तर भाजपसोबत युती करणे आवश्यक आहे. असे झाले तर संख्याबळही वाढेल. आणखी किती विरोधी पक्षातच राहायचे? असा सवाल करत पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्याकडे युती करण्याची मागणी केली आहे.
राज ठाकरेचे परप्रांतीयांच्या धोरणामुळे भाजपासोबत युती होईल का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. भाजपकडूनही युती करायची असेल तर काय करता येईल यासाठी चाचपणी सुरू झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसेकडून अधिकृत प्रस्ताव भाजपकडे आला तर भाजप यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे भाजपा–मनसे युती होणार का? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.