Site icon Aapli Baramati News

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेपासून सरकार पळ काढणार नाही; आर्थिक परिस्थिती पुर्वपदावर आल्यानंतर उरलेल्या शेतकऱ्यांना मदत देणारच : अजित पवार

ह्याचा प्रसार करा

शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंतचे पिक कर्ज शून्य टक्के व्याजाने देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य

मुंबई : प्रतिनिधी

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेतंर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असून सरकार या घोषणेपासून कदापी पळ काढणार नाही अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिली. 

कोरोनामुळे राज्याची तसेच देशाचीही परिस्थिती कमकुवत झाली आहे. लॉकडाऊनमुळे राज्याचे एक ते दीड लाख कोटींचे उत्पन्न घटले आहे. आर्थिक परिस्थिती पुर्वपदावर आल्यानंतर उरलेल्या शेतकऱ्यांना मदत देणारच अशी घोषणाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत केली.

तसेच कर्ज वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंतचे पिक कर्ज शून्य टक्के व्याजाने देणारे एकमेव राज्य आहे असेही अजितदादा पवार यांनी सांगितले. आमदार प्रकाश आबिटकर यांनी यासंदर्भात तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता, त्याला उत्तर देताना अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा केली. 

ठाकरे सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यासाठी तीन निर्णय घेतले होते. दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी‌ तर दोन लाखाच्यावर कर्ज असणाऱ्यांनी वरच्या‌ कर्जाची परतफेड केल्यास त्यांनाही दोन लाखांची माफी आणि ज्यांनी कर्जाची वेळेत परतफेड केली अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.

या योजनेतंर्गत ३१ लाख ८१ हजार शेतकऱ्यांना पात्र ठरवत २० हजार २९० कोटींचे वाटप करण्यात आले आहे. काही शेतकर्‍यांना पुरवणी मागण्यात तरतूद केल्याप्रमाणे मदत मिळेल. तर उर्वरित सर्व शेतकऱ्यांना पुढील अर्थसंकल्पात मदत जाहीर करु अशी घोषणाही अजित पवार यांनी यावेळी केली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version