मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारने सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत भाषेत असाव्यात, असा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट करत, मराठी पाट्यांचे श्रेय फक्त महाराष्ट्र सैनिकांचे आहे. त्यामध्ये इतरांनी श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये, असे खडे बोल सुनावले आहे. तसेच राज ठाकरे यांनी या निर्णयाबद्दल महाराष्ट्र सरकारचे अभिनंदनही केले आहे.
राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रात दुकानावरील नामफलके मराठी भाषेमध्ये असावीत यासाठी आंदोलन करावे लागूच नये. परंतु महाराष्ट्र सैनिकांनी दुकानावरील पाट्या मराठीत असाव्यात, यासाठी २००८ आणि २००९ मध्ये आंदोलने केली. शेकडो सैनिकांनी केसेस अंगावर घेतल्या, शिक्षा भोगली. राज्य सरकारने काल दुकानावरील पाट्या मराठीत असाव्यात, असा निर्णय घेतला. त्यामुळे याचे सगळे श्रेय केवळ मराठी सैनिकांनाच आहे. त्या सर्व सैनिकांचे मनःपूर्वक अभिनंदन. इतरांनी हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये. तो अधिकार केवळ महाराष्ट्र सैनिकांचाच आहे.
या निर्णयाबद्दल महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन. मी राज्य सरकारला एवढेच सांगेन की, कच खाऊ नका, आता या निर्णयाची नीट अंमलबजावणी करा. तसेच नाम फलकावर मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा चालतील हा निर्णय घेण्याची काय गरज होती, असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी इथे फक्त मराठी भाषाच चालणार याची पुन्हा आठवण करून देण्यास लावू नका, असा इशाराही राज्य सरकारला दिला आहे.