Site icon Aapli Baramati News

ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्याकडून कॉँग्रेसला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न : देवेंद्र फडणवीस

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी आणि शरद पवार हे काँग्रेसला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

ममता बॅनर्जी या यापुढे संयुक्त पुरोगामी आघाडीत सहभागी होणार नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ममता बॅनर्जी आणि शरद पवार हे काँग्रेसला खिळखिळी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांमध्ये अंतर्गत वाद सुरू आहेत. काँग्रेसला बाजूला ठेवून देशात आघाडी स्थापन करण्याचा ममतांचा प्रयत्न असून त्याला शरद पवार यांची साथ असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.

सर्वप्रथम काय करायचे ते आपापसात ठरवा. काँग्रेसशी युती करायची की काँग्रेसमुक्त. मात्र याने काहीही फरक पडणार नाही. त्याचा परिणाम सर्वांसमोर असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला. २०१९ मध्येही विरोधकांनी भाजपच्या विरोधात एकत्र येण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरल्याचे सांगत लोकांचा अशा युतींवर विश्वास नसून काहीही झाले तरी नरेंद्र मोदीच २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका जिंकतील, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.  


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version