Site icon Aapli Baramati News

मनी लाँड्रिंग प्रकरण : माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडीसमोर हजर; म्हणाले, माझ्यावरील ‘ते’ आरोप खोटे

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज मुंबईतील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात हजेरी लावली. त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी ईडी कार्यालयात गेल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, ईडीकडून अनिल देशमुख यांना चौकशीसाठी अनेकदा बोलवण्यात आले होते. मात्र ते हजार झाले नाहीत. आज मात्र त्यांनी अचानक ईडी कार्यालयात येत आपले म्हणणे मांडले.

दरम्यान, अनिल देशमुख यांनी आपली माध्यमांसमोर बाजू मांडली आहे. ते म्हणाले की, ‘मी माझी बाजू न्यायालयासमोर मांडली आहे. मी आणि माझ्या कर्मचाऱ्यांनी तपासात सहकार्य केले आहे. परमबीर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. परमबीर सिंग आता देश सोडून पळून गेला आहे का, हेही पाहणे आवश्यक आहे.

याबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांनीही चौकशीबाबत माहिती दिली आहे. १०० कोटी रुपयांच्या कथित लाचखोरी आणि वसुली प्रकरणासंदर्भात अनिल देशमुख यांचा जबाब नोंदवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीरसिंह यांनी केलेल्या आरोपानंतर त्यांना एप्रिलमध्ये राजीनामा द्यावा लागला होता.

या प्रकरणात चौकशीबाबत ईडीने तब्बल चार समन्स बजावले होते. मात्र देशमुख हे एकदाही हजर झाले नाहीत. गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने समन्स रद्द करण्यास नकार दिल्यानंतर ते आज ईडीसमोर हजर झाले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version