Site icon Aapli Baramati News

मंत्रालयावर घोंघावणार पुन्हा पिवळं वादळ..!

ह्याचा प्रसार करा

केडगाव : प्रतिनिधी

धनगर समाज पुन्हा एकदा आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. येत्या २२ फेब्रुवारीला मंत्रालयावर धनगर समाजाचा मोर्चा धडकणार आहे.जवळपास दोन कोटींच्यावर धनगर समाजाची लोकसंख्या आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश व्हावा, यासाठी अनेक वर्षापासून धनगर आरक्षणाचा लढा सुरू आहे.

यापूर्वी धनगर समाजाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु त्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही. त्यामुळे धनगर समाज नाराज झाला आहे. आरक्षण नसल्यामुळे धनगर समाजाचा शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय असा सर्वच विकास खुंटला गेला आहे. 

महाविकास आघाडी सरकारचेदेखील त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आरक्षणाकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर धनगर समाजातील बांधवांनी  उपस्थित राहावे, असे आवाहन यशवंत ब्रिगेडचे उपाध्यक्ष किसन हंडाळ यांनी केले आहे. 

त्याचबरोबर या मोर्चात अहिल्या ब्रिगेड, छावा संघटना, यशवंत सेना आणि इतर संघटना सहभागी होणार आहेत. बारामती शहरात २८ तारखेला यशवंत ब्रिगेडच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, असे प्रदेशाध्यक्ष बापूराव सोलनकर यांनी सांगितले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version