मुंबई : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदुमिल येथील स्मारकाच्या कामाला गती देवून विहित कालावधीत या स्मारकाचे काम पूर्ण व्हावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश देऊन स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी तसेच पुतळा प्रतिकृती अंतिम करण्यासंदर्भातील गठित समितीचे लवकरच पुर्नगठन करण्यात येईल अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदुमिल येथील स्मारकाच्या कामाचा आढावा मंत्री महोदय यांच्या दालनात दूरदृश्यप्रणालीव्दारे आयोजित बैठकीत घेण्यात आला. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त एस.व्ही.आर.श्रीनिवास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव श्याम तागडे, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी यावेळी या बैठकीला उपस्थित होते.
मंत्री मुंडे यांनी यावेळी कोरोना स्थितीमुळे प्रकल्पाच्या कामांचा मुळ कालावधी वाढला आहे. त्यामुळे स्मारकाच्या कामांना गती देवून ते विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देवून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.
वास्तुशास्त्रविशारद यांनी गुणवत्तापूर्ण व पारदर्शक कामावर भर द्या : डॉ.विश्वजित कदम
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदुमिल येथील स्मारक हे जागतिक दर्जाचे असणार आहे. या स्मारकाकडे संपुर्ण जगाचेच लक्ष असणार आहे. हे लक्षात घेवून काम दर्जेदार व्हावे यासाठी संबधितानी लक्ष द्यावे.तसेच कामाच्या सद्यस्थितीची माहिती दर्शनी भागात लावावी अशा सूचना राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी दिल्या.
यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त एस.व्ही.आर.श्रीनिवास यांनी कामांची सद्यस्थिती संदर्भात माहिती दिली. प्रवेशव्दार इमारत,व्याख्यान वर्ग,ग्रंथालय, प्रेक्षागृह,स्मारक इमारत,बेसमेट वाहनतळ,स्मारक इमारत व पुतळा वगळता प्रकल्पाचे अंदाजित काम ४८ टक्के पुर्ण झाले आहे. उर्वरीत कामे गतीने पूर्ण करण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही याबाबतही सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली. स्मारकाचे काम मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. स्मारक इमारत फाऊंडेशनची सद्यस्थिती सचित्र माहितीसह यावेळी बैठकीत सादर करण्यात आली.