पुणे : प्रतिनिधी
भाजप आणि मनसे यांच्यातील वाढती जवळीकता पाहून महानगरपालिकेच्या तोंडावर या दोन पक्षात युती होणार का असे प्रश्न उपस्थित होत होते. मात्र आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या प्रश्नावर उत्तर देताना युतीच्या प्रश्नाला पूर्णविराम दिला आहे.
आगामी महापालिका निवडणुक भाजप स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे भाजप आणि मनसेचा युतीचा प्रश्नच उपस्थित होत नाही. ही मुंबई आणि पुण्यासह इतर महापालिकांवर भाजपा स्वतःच्या ताकदीवर सत्तेत येईल, असा दावा त्यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
काही दिवसांपूर्वी मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीदरम्यान त्यांच्यात काय चर्चा झाली हे समजू शकले नाही. परंतु त्यांच्यात आगामी महापालिका निवडणुकबाबत चर्चा झाली असावी, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
गेल्या निवडणुकीप्रमाणे आगामी निवडणूकही शिवसेना आणि भाजप यांच्यात अटीतटीची होऊ शकते. या दोन पक्षांना मिळालेल्या जागांमध्ये मोजक्याच जागांचा फरक असेल. त्यामुळे मनसे हा पक्ष सत्तास्थापनेच्या बाबतीत किंगमेकर ठरू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.