Site icon Aapli Baramati News

भाजपाने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी चळवळ ठरवून पाप केले : नाना पटोले यांचा आरोप

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

भाजपाची केंद्रात सत्ता आल्यापासून देशात समाजातील वंचित, दलित, शोषित घटकांवरील अन्याय-अत्याचार वाढला आहे. मनुवादी विचार असलेल्या या सरकारने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी चळवळ ठरवून पाप केले असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

गुरुवारी नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्ती अंबिरे यांचा पदग्रहण सोहळा पार पाडला. या वेळी पटोले बोलत होते. पदग्रहण सोहळ्यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड,  मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री विश्वजीत कदम,  प्रमुख प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या आधारावर चालतो. मात्र त्यांचे संविधान बदलण्याची भाजप सरकारची तयारी सुरू आहे. डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि चळवळ संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या मनुवादी व्यवस्थेला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली असल्याचेही नाना  पटोले यांनी यावेळी नमूद केले.

माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या खांद्यावर राहुल गांधी सोनिया गांधी आणि नाना पटोले यांनी मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांनी ही दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडेल. पक्ष संघटनेसाठी काम करेल,  अशी ग्वाही सिद्धार्थ हत्ती अंबिरे यांनी यावेळी दिली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version