Site icon Aapli Baramati News

भाजपला ७० टक्के मतदान झाल्यास गाव जेवण देणार : चंद्रकांत पाटील यांची अजब ‘ऑफर’

ह्याचा प्रसार करा

नांदेड : प्रतिनिधी

देगलूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. सगळ्या पक्षांकडून जय्यत तयारी चालू आहे. या प्रचारादरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या भाजपाचे उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारात ‘ज्या गावांमध्ये भाजपाला ७० टक्के मतदान होईल, त्या गावास माझ्याकडून जेवण दिले जाईल’ अशी अजब ऑफर पाटील यांनी मतदारांना दिली आहे. तसेच ज्या  प्रभागांमध्ये भाजपला ७० टक्‍क्‍यांहून अधिक मतदान होईल. त्या प्रभाग अध्यक्षांना वेगवेगळी बक्षिसे दिली जातील, अशी ऑफर पाटील यांनी दिली आहे. मात्र अशा ऑफर देताना चंद्रकांत पाटील निवडणुकीच्या आचारसंहितेचे भान विसरले आहेत. 

या ऑफरची देगलूर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण नांदेडमध्ये चर्चा रंगली आहे. पाटलांच्या ऑफरवर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्याचे बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘एक दिवस गावाला जेवण  देणार आहात की पुढची तीन वर्षे’ हे  चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट करायला हवे, अशा खोचक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. 

एकीकडे चंद्रकांत पाटील यांनी मतदारांना अजब ऑफर देताना दुसरीकडे राज्य सरकारला केंद्र शासनाने कोरोना लसीकरणासाठी दिलेल्या सहा हजार कोटी रुपयांचा चेक कुठे गेला आहे? असा सवाल केला आहे. मात्र केंद्र शासनाने लसीकरण मोहीम मोफतच राबवली आहे. हा सहा हजार कोटी रुपयांचा चेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भरपाई वापरासाठी द्या, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version