मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष आता फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. हा पक्ष वाचवण्यासाठी राज्यपालांचे निवासस्थान हे भाजपचे कार्यालय करण्यात आले असून तेथून राजकीय खेळ्या केल्या जात असल्याचा आरोप कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. राज्यपालांनी महाविकास आघाडीच्या बारा आमदारांच्या नियुक्त्यांची फाईल रखडून ठेवणे हा याचाच एक भाग असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यामुळे भाजपची पोटदुखी वाढली आहे. त्यामुळे राज्यपालांच्या आडून सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही नाना पटोले यांनी म्हटले आहे. मागील निवडणुकीच्या काळात विरोधी पक्षांतील अनेक जणांना भारतीय जनता पक्षाने आयात केले. आता मात्र या नेत्यांना स्वत:ची फसगत झाल्याचे लक्षात आले असून सत्तेत येण्याचीही चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे अनेकजण भाजपला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
वास्तविक महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर हे सरकार पडेल आणि पुन्हा भाजपची सत्ता येईल अशी स्वप्ने भाजप नेत्यांना पडत होती. त्याच जोरावर विविध पक्षातील आयात केलेल्या लोकांना सांभाळून ठेवले होते. मात्र आता दोन वर्षे होत आली तरी हे सरकार काही पडले नाही आणि आता ते पडणारही नाही. त्यामुळे भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांचे मनोधैर्य खचले असून त्यांनी आता स्वगृही परतण्याची भूमिका घेतल्याचे नाना पटोले यांनी नमूद केले.
वास्तविक सत्ता आपलीच येणार अशी स्वप्ने दाखवत भाजपने अनेकांना झुलवत ठेवले आहे. हा पक्ष आता फुटीच्या उंबरठ्यावर असून राज्यपालांच्या आडून पक्षाची पडझड रोखण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रस्ताव रखडत ठेवणे हाही याचाच भाग असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.