पुणे : प्रतिनिधी
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचाच महापौर होणार आहे. त्यामुळे आतापासूनच अजितदादांच्या नेतृत्वात कामाला लागा, अशा सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्या आहेत. अजितदादांनी पुण्यात विशेष लक्ष दिल्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागलेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात पुण्याची निवडणूक जिंकू असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
पुण्यात आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी कामा लागण्याच्या सूचना केल्या. पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपच्या कारभाराला सर्वसामान्य पुणेकर कंटाळले आहेत. मतदान झाले की पुन्हा भाजपचा काहीच उपयोग नसतो ही बाब पुणेकरांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना खा. सुळे यांनी केल्या.
सध्या पुण्यात राष्ट्रवादीची सत्ता नसली तरी उपमुख्यमंत्री अजित पवार हे या शहरावर विशेष लक्ष देत आहेत. त्यांच्या माध्यमातून अनेक कामे मार्गी लागली आहेत. यापुढेही अजितदादा पुणेकरांसाठी कार्यरत असणार आहेत. त्यामुळे प्रलंबित कामे त्यांच्या माध्यमातून मार्गी लावून घ्या, असे सांगून सुप्रिया सुळे म्हणाल्या, येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीचाच महापौर बनेल, ही खात्री असून कार्यकर्त्यांनी अधिकाधिक लोकोपयोगी कामे करण्यावर भर द्यावा.