पुणे : प्रतिनिधी
केंद्रीय परिवहन मंत्रालयाने नुकतेच वाहतुकीच्या नियमात बदल केले आहेत. पूर्वीपेक्षा दुपटीने दंड वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमांमुळे वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जाणार आहे. मात्र असे असताना पुण्यात एक विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. नियमांचे उल्लंघन न करताच एका नागरिकाला वाहतूक शाखेकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
ऋषिकेश ताम्हाणे असे या पुणेकराचे नाव आहे. वाहन चालवताना हेल्मेटचा वापर न केल्याने त्यांच्या मोबाईलवर ही नोटिस आली होती. ५ डिसेंबर रोजी वाहतूक शाखेने त्यांच्या मोबाईलवर ही नोटीस पाठवली होती. सोबत वाहतूक शाखेने फोटो देखील पाठवला होता. मात्र प्रत्यक्षात ती व्यक्ती ऋषिकेश नसून वाहन क्रमांकही चुकीचा आहे. वाहतूक शाखेच्या अशा मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य जनता भरडली जात आहे.
वाहतूक शाखेने आतापर्यंत नियमाचे उल्लंघन न करता साडेतीन हजाराहून अधिक नागरिकांना अशा खोट्या नोटिसा पाठवल्या आहेत. ती नोटीस खोटी आहे हे सिध्द करण्यासाठी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच नुकतेच नवीन नियम लागु केले आहेत. सर्वसामान्य लोकांना हे नियम मान्य नाहीत. असे असताना खोट्या नोटिसा बजावल्यामुळे संतापाची भावना व्यक्त होत आहे.