पुणे : प्रतिनिधी
त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. त्यातून राज्यात काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर दोन समाजामध्ये तेढ आणि वाद निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर किंवा पोस्ट टाकण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी या संदर्भात आदेश पारित केले आहेत.
त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ राज्यात अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचाराच्या घटना घडल्या. अमरावती सोबतच नांदेड, मालेगाव, पुसद, कारंजा येथेही तेढ निर्माण झाला आहे. या घटनेचे पडसाद पुणे जिल्ह्यातही उमटण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारी घेत जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.
जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या आदेशानुसार, कोणत्याही व्यक्तीला समाजमाध्यमांवर जातीय तेढ निर्माण पोस्ट किंवा माहिती पसरवता येणार नाही. समाज माध्यमावर पोस्ट किंवा माहिती टाकल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रुप अॅडमिनची असेल. समाजात जातीय तेढ निर्माण करणारी माहिती पसरवल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
२० नोव्हेंबरपर्यंत ही जमावबंदी लागू असणार आहे. या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना जमावाने फिरता येणार नाही. कोणत्याही प्रकारच्या सभा घेता येणार नाहीत. शस्त्र आणि लाठ्याकाठ्या वापरण्यास पूर्णतः बंदी असेल. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या कोणतेही फ्लेक्स बोर्ड लावल्यास किंवा घोषणाबाजी केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.