पिंपरी : प्रतिनिधी
अनेकदा अज्ञात व्यक्ती तुम्हाला ॲप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगतात आणि तुम्ही पण ते लगेच डाऊनलोड करता. असे करत असाल तर थांबा? कारण चिंचवडगावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने एप्लीकेशन डाउनलोड करण्यास सांगून तरुणाच्या बँक खात्यातून सव्वादोन लाख रुपये काढून घेतली आहे. हा सर्व प्रकार रविराज सतीश कर्णे या तरुणासोबत घडला आहे.
रवीराज सतीश कर्णे (रा. चिंचवडगाव, पुणे) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. रविराज यांचे मोबाईल मध्ये योनो ॲप्लिकेशन चालत नसल्याने त्यांनी ऑनलाईन कस्टमर केअरला फोन केला. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने फोन उचलला आणि अॅनडेस नावाचे ऍप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले.
रविराज यांनी त्याच दिवशी सायंकाळी पाचच्या दरम्यान आपला बँक बॅलन्स चेक केला. त्यावेळी केवळ बँकेत दहा रुपये शिल्लक असल्याचे त्यांना दिसून आले. बँकेत चौकशी केल्यानंतर सेविंग अकाउंट वर व डिपॉझिट वर केलेले पैसे खात्यावर ट्रान्सफर झाले आहेत. तसेच एटीएम मधून २० हजार रुपये काढून घेतले असल्याचे आढळले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चिंचवड पोलिस ठाण्यातील पोलीस अधिकारी करत आहे.