
मुंबई : प्रतिनिधी
आरोग्य विभागाच्या पेपर फुटीचे प्रकरण ताजे असतानाच म्हाडाच्या परीक्षा ऐनवेळी रद्द करण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नोकरी देऊ शकत नसाल, तर किमान विद्यार्थ्यांची थट्टा तरी करू नका असे ट्विट करत राज्य सरकार नावाची यंत्रणा कधी कार्यान्वित होणार ? असा सवाल उपस्थित केला आहे.
आरोग्य विभागाच्या भरतीचे पेपर फुटीचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहचले आहेत. म्हाडाच्या परीक्षेचाही घोळ सुरू आहे. राज्य सरकारने भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस गाठला असल्याची टीका करत किती दिवस आणि कितीवेळा हे सहन करायचे ? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. आज पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. नोकरी देऊ शकत नसाल तर किमान विद्यार्थ्यांची थट्टा तरी करू नका, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.तसेच दोषींवर कारवाई कराच. मात्र सरकार म्हणून कुणी याची जबाबदारी घेणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
दरम्यान, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काल मध्यरात्री दीड वाजता ट्विट करत आज होणारी म्हाडाची परीक्षा रद्द केल्याचे जाहीर केले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी विद्यार्थ्यांची माफी मागत काही कारणांमुळे आणि तांत्रिक अडचणीमुळे म्हाडाची आणि इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे म्हटले आहे. या परीक्षा जानेवारी महिन्यात घेण्यात येतील. ऐनवेळी परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. त्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली. परंतु आता विरोधी पक्षांकडून राज्य सरकारला टार्गेट केलं जात आहे.