मुंबई : प्रतिनिधी
देशाच्या राजकारणात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या स्मरणशक्तीबद्दल नेहमीच कुतूहलाने बोललं जातं. आज दस्तुरखुद्द अभिनेते तथा कवी किशोर कदम यांनीच शरद पवार यांना याबद्दल विचारलं. त्यावर शरद पवार यांनी मुख्यमंत्री असतानाचा एक किस्सा सांगितला. त्यावरच न थांबता तुम्हाला राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवायला शिकलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला.
जेष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत ‘नेमकचि बोलणे’ या भाषणसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर साहित्यिक आणि कवींनी या पुस्तकांच्या काही भागांचे वाचन केले. यावेळी अभिनेते आणि कवी किशोर कदम यांनी शरद पवार यांना तुम्ही कार्यकर्त्यांची नावे कशी लक्षात ठेवता असा प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार यांनी मुख्यमंत्री असतानाचा एक भन्नाट किस्सा सांगितला.
यावेळी बोलताना राजकारणात तुम्ही कमी कष्टाने आणि कमी भांडवलात यश मिळवू शकता. केवळ तुम्ही समोरच्याचे नाव लक्षात ठेवायला शिकलं पाहिजे असा सल्ला देवून शरद पवार म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना मला एक महिला भेटायला आली. ती माझ्याच मंतदारसंघातून आलेली होती.. तिला पाहिल्यानंतर मी तिला विचारलं, काय गं कुसुम.. काय काढलं मुंबईला..? हे ऐकून ती म्हणाली, काम होवो न होवो.. साहेबांनी मला नावानं हाक मारली..! हा किस्सा ऐकताच सभागृहात हशा पिकला.
शरद पवार पुढे म्हणाले, आपल्याकडील लोकांना खूप छोट्या गोष्टींमध्ये समाधान मिळतं.. या गोष्टी आपण जाणीवपूर्वक लक्षात ठेवल्या पाहिजेत. महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील हे दोन्ही नेते लोकांच्या बाबतीत असंच वागायचे. दोघांकडे कितीही जुन्या व्यक्ती गेल्या, तरी त्याचे नाव लक्षात ठेवायचे. या गुणांमुळेच या लोकांना समाजामध्ये कायम स्थान मिळवण्यात यश आलं.. असंही शरद पवार यांनी यावेळी नमूद केलं..