पुणे : प्रतिनिधी
प्रसिद्ध नाटककार, लेखक जयंत पवार यांचे निधन झाले आहे. ते ६१ वर्षांचे होते. पवार यांना रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. जयंत पवार यांच्या निधनाने नाट्य क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले होते. महाड येथे झालेल्या १५ व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जयंत पवार यांनी भूषवले होते. ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहासाठी २०१२ साली साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.
ज्येष्ठ पत्रकार, नाटककार जयंत पवार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
‘साहित्य अकादमी’ पुरस्कारविजेते साहित्यिक, ज्येष्ठ नाटककार, पत्रकार जयंत पवार यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करणारा, दुर्बल-वंचिताचं जगणं नाटकातून, साहित्यातून जिवंत करणारा सिद्धहस्त लेखक, पुरोगामी, विद्रोही व्यक्तिमत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, सामाजिक विषयांची आशयघन मांडणी करुन ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांनी नाट्यक्षेत्र समृद्ध केलं. पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक विषय समर्थपणे हाताळले. समाजातील वंचित, दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी लेखणीतून प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारलं. जयंत पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या नाट्य, साहित्य, पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.