मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी अंमली पदार्थ नियंत्रण विभाग आणि समीर वानखेडे यांच्या कारभाराचे वाभाडे काढले आहे. त्याचवेळी त्यांनी भाजपलाही लक्ष्य केले आहे. अशातच नवाब मलिक यांनी परदेश दौऱ्यावर जाताना, मी परदेश दौऱ्यावर जात असून माझ्या हालचालींवर लक्ष्य ठेवा, माझ्या हालचाली ट्रॅक करा असे ट्विट करत आव्हान दिले आहे.
मी दुबईच्या दौऱ्यावर जात आहे. यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सगळ्या आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी मी पुन्हा भारतात परतणार आहे. त्यामुळे मी सगळ्या सरकारी संस्थांना विनंती करतो की, माझ्यावर नजर ठेवा. सगळ्या हालचाली ट्रॅक करा, असे आव्हानच नवाब मलिक यांनी केंद्रीय तपास यंत्रणेचे नाव न घेता केले आहे.
समीर वानखेडे यांनी शाळा सोडल्याचा बनावट दाखला सादर केला असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. या आरोपानंतर मलिकांनी जातिवाचक आणि व्यक्तिगत राजकारण करू नये, असे भाजपने म्हटलं आहे. नवाब मालिक आणि समीर वानखेडे यांच्या आरोपांवर उच्च न्यायालयामध्ये सुनावणी चालू आहे. अशातच नवाब मलिक यांनी परदेश दौऱ्यावर जाताना केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.