Site icon Aapli Baramati News

धक्कादायक : रुबी हॉस्पिटलकडून गोरगरीब रुग्णांची हेळसांड; राष्ट्रवादीचे ‘हे’ आमदार उद्यापासून करणार उपोषण

ह्याचा प्रसार करा

शिरूर : प्रतिनिधी

रुग्णालयांकडून चालणाऱ्या अरेरावीचा फटका सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना बसला आहे. पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक या रुग्णालयाने शिरूर तालुक्यातील न्हावरा येथील अपघातग्रस्त मुलावर उपचारास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे आता रुबी हॉस्पिटलच्या कारभाराविरोधात उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना पत्र दिले आहे.

न्हावरा येथील विश्वजित संजय गायकवाड (वय १५) या मुलाचा ३ नोव्हेंबर रोजी अपघात झाला. त्यामध्ये या मुलाच्या मेंदुला मार लागला होता. त्याच्या उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही त्यांनी उपचारासाठी १ लाख ८ हजार रुपये हॉस्पिटलकडे जमा केले होते. मात्र, आणखी पैसे भरण्यास सांगितल्यानंतर संबंधित कुटुंबाला ते देता आले नाहीत.

रुग्णालय प्रशासनाने बिलाचे पैसे देता येत नसल्यास रुग्णाला घरी घेऊन जा अशा शब्दांत सुनावले. विशेष म्हणजे, संबंधित रुग्णाच्या कुटुंबीयांनी धर्मादाय आयुक्तांच्या सवलतीतून उपचारासाठी अर्ज केला होता. त्यावरही निर्णय न घेता त्याला रुग्णालयाने उपचार करण्यास नकार दिला. त्यामुळे शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी संताप व्यक्त करत रुग्णालय प्रशासनास चांगलेच धारेवर धरले.

रूबी हॉस्पिटलच्या कारभाराबद्दल काय म्हणाले आमदार अशोक पवार..? पहा व्हिडिओ..

आमदार अशोक पवार यांनी धर्मादाय आयुक्त काटकर यांनाही या प्रकाराची कल्पना दिली.  त्यांनीही पवार यांच्यासोबत रुग्णालयात संबंधित डॉक्टरांची कानउघाडणी केली. रुग्णालय प्रशासनाने त्यानंतर माफी मागत उपचार करण्यास होकार दिला. त्यानंतरही पवार यांनी रुबी हॉस्पिटलविरोधात अनेक तक्रारी असल्याने त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी या मागणीसाठी उपोषणाचा निर्धार कायम ठेवला आहे. त्यानुसार ते उद्या १२ नोव्हेंबर रोजी उपोषणास बसणार असल्याचे सांगितले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version