पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
शहरातील भोसरी परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिडीत मुलीवर आरोपीने सतत लैंगिक अत्याचार करत गर्भवती केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीची बहीण त्याला या कामात मदत करत होती.
दत्तू बसप्पा पुजारी असे मुख्य आरोपीचे नाव असून त्याची बहीण बंडू पुजारी ही त्याला या गुन्ह्यात मदत करत होती. पीडितेला पट्ट्याने मारहाण करत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. त्यातून ही अल्पवयीन पिडीती गर्भवती राहिली आहे . पिडीती गर्भवती राहिल्यानंतर आरोपी दत्तूने आपली बहीण बंडूच्या मदतीने गर्भपात करण्यासाठी गर्भपाताच्या गोळ्या व पपई हे फळ खाण्यास दिले आणि त्यानंतरही लैंगिक अत्याचार करत राहिला.
पीडित मुलींच्या कुटुंबियाच्या तक्रारीवरून भोसरी पोलीस ठाण्यात दत्तू पुजारी आणि बंडू पुजारी या भावाबहिणीच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेऊन भोसरी पोलिसांनी दत्ता पुजारी या आरोपीस अटक केली आहे. परंतु आरोपीची बहिण बंडू पुजारी ही फरार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.