Site icon Aapli Baramati News

धक्कादायक : पत्नी आणि सासूच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या; पुण्यातील घटना

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

सासू सासऱ्यांपासून वेगळं राहण्याचा तगादा लावत पत्नीकडूनच चारित्र्यावर संशय घेतला जात असल्यानं पुण्यातील धनकवडी भागात राहणार्‍या एका ३० वर्षीय पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

शरद नरेंद्र भोसले असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर पत्नी प्रियांका शरद भोसले (वय २८), सासरे शंकर शिंदे (वय ५६), सासू रोहिणी शिंदे आणि मेहुणा मनीष ऊर्फ गणेश शिंदे (रा. कवडीपाट लोणी काळभोर) अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद आणि प्रियांका या दोघांच्या लग्नाला साधारण तीन वर्ष झाली. तेव्हापासून दोघांमध्ये वाद व्हायचे. पत्नी आणि सासरची मंडळींनी शरदकडे सासू आणि सासर्‍यापासून वेगळे राहण्याचा तगादा लावून धरला. हे सुरू असताना पत्नी प्रियांका ही शरदच्या चारित्र्यावर संशय घेऊन देखील भांडण करायची. त्यातून प्रियांका ही माहेरी राहण्यास गेली. यावेळी देखील शरदला सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास सुरूच होता. या त्रासाला कंटाळून शरद याने धनकवडी येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

शरद याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात पत्नी, तसेच सासरच्या मंडळीच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे.  याप्रकरणी मयत शरद यांचे वडील नरेंद्र भोसले यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार पत्नी प्रियांका शरद भोसले, सासरे शंकर शिंदे, सासू रोहिणी शिंदे आणि मेहुणा मनीष ऊर्फ गणेश शिंदे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version