
दौंड : प्रतिनिधी
दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या सुसज्ज डायलिसीस युनिटचे आज आमदार राहुल कुल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सुसज्ज अशा या डायलिसीस युनिटमध्ये रूग्णांच्या देखरेखीसाठी आवश्यक सर्व उपकरणांचा समावेश असून सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून २ डायलिसीस मशीन व युवा उदयोजक श्री. जितेंद्र मगर यांनी स्व. निवृत्ती कोंडीबा मगर यांच्या स्मरणार्थ आवश्यक फर्निचर आणि वातानूकलन यंत्रणा दिली आहे.
उच्च रक्तदाब, मधुमेह आदी व्याधींमुळे किडनी (मूत्रपिंड) निकामी झाल्यानंतर रुग्णाला डायलिसीसची आवश्यकता असते परंतु डायलिसीस साठीच्या अपुर्या सुविधा व त्याचा खर्च गोरगरिबांच्या आवाक्याबाहेर असतो तेव्हा दौंड तालुक्यातील गोर गरीब रुग्णांना डायलिसीसची मोफत सुविधा उपलब्ध होणार असुन उपचारासाठी त्यांना पुण्याला जायची गरज भासणार नाही.
प्रसंगी दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे व सर्व कर्मचाऱ्यांशी आमदार राहुल कुल यांनी संवाद साधला. आमदार कुल यांनी सिद्धिविनायक ट्रस्टकडे पाठपुरावा केला होता. त्यातून दोन डायलिसीस मशीन उपलब्ध झाल्या आहेत. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, नगरसेविका अरुणा डहाळे, डॉ. दीपक जाधव, जितेंद्र मगर, राजू गजधने यांच्यासह वैद्यकीय रुग्णालयातील सर्व अधिकारी, सेवक उपस्थित होते.