Site icon Aapli Baramati News

देवेंद्रजी.. तुमचे खासदार सायकलवर डबलसीट संसदेत जात होते : नवाब मलिकांचा टोला

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानपदावरून त्यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. देवेंद्रजी, जेव्हा तुम्ही शाळेत जात होता, त्यावेळी १९८४ साली लोकसभेत भाजपाचे दोनच खासदार होते. तुमचे खासदार सायकलवर डबलसीट संसदेत जात होते हे विसरलात का..? असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला आहे.

काल शरद पवार यांचा ८१ वा वाढदिवस झाला. देशासह राज्यातील नेत्यांनी शरद पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानपदावरून शरद पवार यांच्यावर टीका केली होती. काही वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे राजकारण संपले असल्याचे सांगितले होते. मात्र त्यावेळी चमत्कार घडला होता. आताही टीका करत आहेत. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस शरद पवार यांच्यावर टीका करतात. त्यावेळी चमत्कार घडतो. २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीतही असाच चमत्कार  घडवून आणू, असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांना समजायला हवे की राजकारणात कोणीच अमृत पिऊन सत्तेत बसत नसतो.  शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार हे पंतप्रधान होणार असल्याचा कुठलाच दावा केलेला नाही. उलट शरद पवार हे देशातील सगळ्या विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याचे काम करत आहेत. त्यामुळे  विरोधकांची एकी झाल्यावर भाजपा सत्तेतील बाहेर गेल्याचे पाहायला मिळेल असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version