Site icon Aapli Baramati News

दु:खद बातमी : ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन

ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ (वय ६७) यांचे आज दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून विनोद दुआ आजारी होते. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान आज त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांची मुलगी मल्लिका यांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच विनोद दुआ आणि त्यांच्या पत्नी पद्मावती या दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती. या दरम्यान, पद्मावती यांचे निधन झाले होते. कोरोनातून बरे झाल्यानंतर विनोद दुआ यांच्या प्रकृतीत सातत्यानेबिघाड होत होता. त्यामुळे त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज त्यांचे उपचारादरम्यान, निधन झाले.

यासंदर्भात त्यांच्या कन्या मल्लिका यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत माहिती दिली आहे. अत्यंत भावनिक पोस्ट लिहीत आता आपले वडील आणि आई एकत्र असतील, तिथेही ते सुंदर जीवन जगतील असे मल्लिका यांनी म्हटले आहे.विनोद दुआ यांना मल्लिका आणि बाकुल अशा दोन मुली आहेत.  

 दरम्यान,  ४२ वर्षाहून अधिक काळ पत्रकारीतेत असलेल्या विनोद दुआ यांनी आपला विशेष दबदबा निर्माण केला होता. दूरदर्शनवरील जनवाणी कार्यक्रमातून प्रसिद्ध झालेले विनोद दुआ हे विश्लेषकाच्या भूमिकेत पाहायला मिळाले. एनडीटीव्हीमध्येही त्यांची कारकीर्द गाजली. त्यांच्या अकाली निधनाने पत्रकारिता जगतामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.   


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version