कोल्हापूर : प्रतिनिधी
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची पूर्व व्यवस्थापक दिशा सालियान आत्महत्या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशाची आत्महत्या नसल्याचे विधान केले. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नारायण राणे यांच्या विधानाची चौकशी करण्याची राज्य महिला आयोगाकडे मागणी केली. अशातच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिशा सालियानच्या मृत्यूचे सत्य ७ मार्चनंतर बाहेर येणार असल्याचा दावा केला आहे.
कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, दिशा सालियानच्या मृत्यूबाबत कोणतेही राजकारण चालू नाही. तिच्या मृत्यूबाबत ७ मार्चनंतर सत्य बाहेर येईल. त्यावेळी दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. त्यावेळी कोण गुंतेल आणि कोणाला जावे लागेल, हे सगळे स्पष्ट होईल. यामुळेच सध्या उसने अवसान आणून शिवराळ भाषा वापरली जात आहे. दिवा विझण्यापूर्वी फडफडतो तसा हा सगळा प्रकार चालू असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
सध्या महाविकास आघाडीचे नेते रांगेत उभा आहेत. काही नेते जात्यात आहेत तर काही सुपात आहेत. उत्तरप्रदेशमधील विधानसभेचे ७ मार्चला शेवटच्या टप्प्यातील मतदान होईल. शक्यतो त्यानंतर कारवाईस सुरुवात होणार आहे. त्यामध्ये सरकारची पळता भुई थोडी होणार आहे. त्यानंतर हे सरकार पडेल, असे माझे विश्लेषण आहे. असा अंदाज सामान्य माणूस देखील बांधू शकतो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.