मुंबई : प्रतिनिधी
इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. मात्र ऑनलाईन पद्धतीने या परीक्षा घेण्यात याव्यात या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराला घेराव घातला.
काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ऑफलाईन पद्धतीने बोर्डाच्या परिक्षा घेण्यात येणार आहेत असे सांगितले आहे. ऑनलाईन पद्धतीने बोर्डाच्या परीक्षा घेण्यात याव्या या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. हजारोंच्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर या विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी सुरुवातीला आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यार्थी एकायला तयार नव्हते. त्यामुळे या विद्यार्थ्यांची गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. त्यामुळे काही वेळ या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मुंबईसह राज्यात इतर ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. कोणाच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी आंदोलन केले? त्यांना कोण भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत? असा सवाल उपस्थित होत आहे. कोरोनाचे नियम पायदळी तुडवत केलेल्या विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.