Site icon Aapli Baramati News

दसरा दिवाळीचे निमित्त पाहून गायब झालेले विरोधक समोर येतात : धनंजय मुंडे यांचे प्रत्युत्तर

ह्याचा प्रसार करा

बीड : प्रतिनिधी

मागील वर्षी मार्च महिन्यात टाळेबंदी करण्यात आली होती. तेव्हापासून जनतेतून गायब झालेले विरोधक दिवाळी दसऱ्याच्या निमित्त जनतेसमोर येतात,  अशा शब्दांत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

 शिरसाळ (परळी) येथे उपबाजारपेठ अंतर्गत कै. पंडित अण्णा मुंडे व्यापारी संकुलाच्या गाळे बांधकाम भूमिपूजनाचा कार्यक्रम आज धनंजय मुंडे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला.

टाळेबंदी लागू झाली होती तेव्हापासून जनतेतून विरोधक गायब झाले होते. दिवाळी दसऱ्याच्या निमित्ताने ते जनतेसमोर येतात. आम्ही पहिल्या दिवसापासून रुग्णांच्या सेवेत आहोत. शेकडो रुग्णांना सेवा पुरवली आहे.  हजारो गरजू कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप केले आहे. आम्ही मदत केलेले लोकांमध्ये भाजपाचे कार्यकर्ते देखील होते. मात्र आम्ही केलेली मदत या हाताच्या ते हाताला कळू देत नाही.  तो आमचा स्वभाव आहे, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

आज मतदारसंघातल्या अनेक संस्था समृद्ध होत आहेत. मात्र हजारो शेतकऱ्यांच्या आशास्थान असलेला वैद्यनाथ साखर कारखाना बिकट परिस्थितीमध्ये आहे. हा कारखाना कधी चालू होणार?  असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. त्यांनी निदान एखादे ट्विट करत साखर कारखाना कधी चालू होणार याबाबत सांगावे, असा प्रत्यक्ष सवाल धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांना केला आहे. या भागातील एकही शेतकऱ्यांचा ऊस राहणार नाही , असे आश्वासन धनंजय मुंडे यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version