मुंबई : प्रतिनिधी
सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे शिवसेनेतून अन्य कोणाला मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार द्यावा,अशी चर्चा विरोधकांकडून होत आहे. त्यातच आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नवीनच वक्तव्य केलं आहे. शिवसेनेच्या फॉर्म्युल्यानुसार माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांना मुख्यमंत्री बनवावं, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
भाजपकडून शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर वारंवार टीका होत असते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानेवर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला आहे. मुख्यमंत्रीपद कोणाकडे तरी सोपवावे, अशी मागणी भाजपकडून मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर एका पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी या विषयावर भाष्य केलं आहे. पुन्हा एकदा शिवसेना-भाजप एकत्र यावे आणि शिवसेनेच्या अडीच वर्षांच्या फॉर्मूलानुसार फडणवीसांना मुख्यमंत्रीपद सोपवावे, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात जुगलबंदी रंगणार आहे.