Site icon Aapli Baramati News

‘तुम्ही जे काही केले आहे, त्याची किंमत तुम्हाला मोजावीच लागेल’: शरद पवार यांचा भाजपला इशारा

ह्याचा प्रसार करा

नागपूर : प्रतिनिधी

सध्या  महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या प्रकरणावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पहिल्यांदाच उघडपणे बोलले आहेत. याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग बेपत्ता झाल्याचे सांगत त्यांनी भाजपवर  हल्लाबोल केला आहे.

नागपूर दौऱ्यादरम्यान बोलताना शरद पवार यांनी भाजपकडून सुरू असलेल्या राजकारणावर हल्लाबोल केला. ते म्हणाले,  अनिल देशमुख यांना तुम्ही तुरुंगात टाकले, परमबीर सिंग फरार झाले आहेत. तुम्ही जे काही केले आहे, त्याची किंमत तुम्हाला मोजावीच लागेल.

पुढील सार्वत्रिक निवडणुकीत भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व कोण करणार हा मोठा प्रश्न नसल्याचेही शरद पवार म्हणाले. त्याऐवजी भाजपला घेरण्यासाठी जनतेच्या अपेक्षेनुसार नेतृत्व दिले जावे, हीच चिंतेची बाब आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अमरावतीमध्ये नुकताच झालेला हिंसाचार दुर्दैवी असल्याचे सांगून पवार म्हणाले की, अशा घटनांमध्ये नुकसान झालेल्या व्यापारी आणि दुकानदारांचे नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारने धोरण आखले पाहिजे.

आगामी लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी विरोधी आघाडीचे नेतृत्व करू शकतात का? या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले की, येत्या संसदेच्या अधिवेशनात यावर चर्चा केली जाईल. यावर्षी जूनमध्ये शरद पवार यांनी एसपी, आरजेडी, आप, आरएलडी आणि डावे अशा 8 पक्षांना बोलावले होते.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version