ठाणे : प्रतिनिधी
ठाण्यात शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. हिंमत असेल तर रक्तदान शिबीराच्या ठिकाणी अशी गर्दी करून दाखवा, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना चिमटा काढला आहे.
शिवसेनेच्या ठाणे आणि पालघर जिल्हा शाखेतर्फे ८ ते १४ ऑक्टोबरदरम्यान छत्रपती शिवाजी मैदान येथे रक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उदघाटन करताना मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, दीड वर्षांहून अधिक काळापासून पसरत असलेल्या कोरोनाचा विषाणू आणि परिणामी रक्ताचा तुटवडा पाहता, एकनाथ शिंदे यांनी नवरात्री दरम्यान 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान रक्तदान सप्ताह आयोजित करण्याची संकल्पना मांडली. बोलताना “रक्तदान हा शब्द बोलायला खूप सोपा आहे. पण खरोखर किती जण आपले कर्तव्य पार पाडत आहेत असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
खरंच किती राजकिय नेतेमंडळी समाजसेवा करतात हे आज आपण पाहात आहोत. तसेच सद्यस्थिती पहिली तर राजकारणात कीड वळवळू लागली आहे. मोठमोठ्या लांब जीभा काढून बडबड करतात. त्यांना मला सांगायचं आहे की, तुमच्यात ही हिंमत आहे का? हिंमत असेल तर रक्तदान करण्यासाठी स्वत: राजकिय नेतेमंडळीनी इतकी गर्दी करून दाखवावी असा टोला त्यांनी लगावला.
ठाण्यातील रक्तदान शिबीर पुढील सलग आठ दिवस राबविण्यात येणार आहे. यावेळी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही रक्तदान केले.