Site icon Aapli Baramati News

तलाठी संवर्गाच्या बदल्यांना २०१९ च्या शासन निर्णयातून वगळण्याबाबत सकारात्मक : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी 

तलाठी संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदल्यांना दि. १५ मे २०१९ च्या शासन निर्णयातून वगळण्याबाबत महसूल विभागाने सविस्तर प्रस्ताव करून सामान्य प्रशासन विभागाला पाठवावा तसेच या प्रस्तावावर सामान्य प्रशासन विभागाने सकारात्मक कार्यवाही करावी, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

तलाठी संवर्गाच्या बदल्यांबाबतच्या समस्यांविषयी श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महसूल व वनविभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव श्रीमती गीता कुलकर्णी, अवर सचिव दि. बा. मोरे यांच्यासह महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

शासकीय कर्मचाऱ्याच्या विनंतीनुसार संवर्गाअंतर्गत एका नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवरुन दुसऱ्या नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवर कायमस्वरुपी समावेशनाबाबतचा शासन निर्णय दि. १५ मे २०१९ रोजी जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयात जिल्हा अंतर्गत एका नियुक्ती प्राधिकाऱ्याकडून दुसऱ्या नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवर बदलीने कायमस्वरूपी समावेशन करता येणार नाही अशी तरतूद आहे. त्यामुळे तलाठी संवर्गाची विनंती बदली जिल्ह्यातल्या जिल्ह्यात एका उपविभागीय अधिकाऱ्याच्या आस्थापनेवरून दुसऱ्या उपविभागीय अधिकाऱ्याच्या आस्थापनेवर होत नाही. या कारणाने न्याय मिळत नसल्याची भावना तलाठी महासंघाने राज्यमंत्री श्री. भरणे यांच्याकडे व्यक्त केली. त्याची तात्काळ दखल घेऊन या शासन निर्णयातून तलाठी संवर्गाला वगळण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश श्री. भरणे यांनी दिले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version