बीड : प्रतिनिधी
परळी येथील वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी मंदिर ट्रस्टला मिळाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रभू वैद्यनाथ मंदिराची एक वीटही इकडची तिकडे होणार नाही, कुणीही घाबरून जाऊ नये असं आवाहन केलं आहे.
या संदर्भात धनंजय मुंडे यांनी रात्री उशिरा ट्विट केले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या मंदिरास आरडीएक्सने उडवण्याची धमकी मंदिर ट्रस्टला मिळाली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलिस महासंचालक, बीडचे पोलिस अधीक्षक यांच्यासह दहशतवाद विरोधी पथकास याबाबत माहिती दिली असून पोलीस खाते याबाबत त्वरित कारवाई करत आहे.
या धमकीमुळे कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही. प्रभू वैद्यनाथ मंदिराची एक वीटही इकडची तिकडे होणार नाही. वैद्यनाथ प्रभू दुःख, अडचणी, आजार बरे करणारे वैद्य हे नाव घेऊन परळीत अनादी कालापासून विराजमान आहेत. त्यामुळे धमकी देणारे लवकरच गजाआड असतील, असेही त्यांनी या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
मंदिर उडवून देण्याची धमकी नेमकी कोणी दिली याविषयी अधिकची माहिती समोर आलेली नाही. मात्र ५० लाख रुपयांची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. हे पत्र नांदेडहून आल्याची प्राथमिक माहिती आहे. धमकी मिळाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि मंदिर ट्रस्ट भीतीच्या सावटाखाली आले आहेत. पोलिस यंत्रणा अलर्टवर असून मंदिर परिसरात तात्काळ बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.