आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महानगरेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

गुरुजींनी शिक्षणप्रसाराच्या माध्यमातून ध्येयनिष्ठा, कर्तव्यनिष्ठेचा आदर्श निर्माण केला; गुरुजींनी घडविलेले विद्यार्थीच त्यांच्या कार्याचा, विचारांचा वारसा पुढे घेऊन जातील : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आलुरे गुरुजींना कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली

महानगरे
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

“तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार, शिक्षणमहर्षी आदरणीय सिद्रमप्पा आलुरे गुरुजींनी त्यांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक कार्यातून समाजासमोर ध्येयनिष्ठेचा, कर्तव्यनिष्ठेचा आदर्श ठेवला. सार्वजनिक जीवनात निष्ठापूर्वक काम करण्याचा परीपाठ घालून दिला.  गुरुजींनी अनेकांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण केला. कित्येकांच्या चुली पेटत्या ठेवण्याचं काम गुरुजींनी शिक्षणप्रसाराच्या कार्यातून केलं. आलुरे गुरुजींना घडवलेले विद्यार्थीच त्यांच्या कार्याचा, विचारांचा वारसा पुढे घेऊन जातील,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिद्रमप्पा आलुरे गुरुजींच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

शिक्षणमहर्षी आलुरे गुरुजींना श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आलुरे गुरुजी खऱ्या अर्थानं शिक्षणमहर्षी होते. त्यांनी शिक्षणाची गंगा गरीबांच्या घरापर्यंत नेली. गावात शाळा नाही. वर्गखोल्या नाहीत. खोल्यांना भिंत नाही. फळा नाही. खडू नाही. अशी कुठलीही अडचण विद्यार्थ्यांना शिकवण्यापासून त्यांना रोखू शकली नाही. गरज पडली तेव्हा देवळाच्या आवारात, झाडाच्या पारावर त्यांनी शाळा भरवली. विद्यार्थ्यांना औपचारिक शिक्षणाच्या बरोबरीनं नैतिक शिक्षणही दिलं. पायाभूत सुविधांपेक्षा शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर त्यांचा भर असायचा. त्यामुळेच गुरुजींचे अनेक विद्यार्थी राज्यपातळीवरील परीक्षेत अव्वल ठरले. जीवनाच्या अनेक क्षेत्रात विद्यार्थ्यांनी मोलाचं काम केलं. राष्ट्रनिर्मितीत योगदान दिलं. गुरुजींने दिलेले विचार हेच विद्यार्थी पुढे घेऊन जातील.

उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात पुढे म्हणतात की, आलुरे गुरुजींचं कार्य, विचार जितके उत्तुंग होतं, तितकीच त्यांची राहणी साधी होती. शिक्षणक्षेत्रात निरपेक्षपणे काम कसं काम करावं, याचं गुरुजी हे मुर्तीमंत उदाहरण होते. गुरुजींनी राज्याच्या विधीमंडळात तालुक्याचं प्रतिनिधीत्वं केलं. परंतु त्यांनी पहिली पसंती ही कायम विद्यार्थ्यांना शिकवण्यालाच राहीली. गुरुजींनी त्यांच्या आचार, विचार, विहारातून अनुयायी जोडले. समाजाकडून निर्व्याज प्रेम, आदर, विश्वास मिळवलेलं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं. त्यांचं निधन ही तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी आहे. मी स्वर्गीय गुरुजींना विनम्र आदरांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.


ह्याचा प्रसार करा
महानगरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us