नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आमदार आशिष शेलार यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर शिवसेना आणि भाजपमधील वाद शिगेला पोहोचला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाजप नेते आणि ट्रोलर्सवर टीका केली होती. त्यांनी टीकाकारांना ‘Xतिया’ असा शब्द वापरला. त्यावरून भाजपने जोरदार आक्षेप घेत संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यावर आता, मी असंसदीय शब्द वापरला नाही. माझ्याविरोधात जी तक्रार करायची ती करा असे आव्हानच संजय राऊत यांनी दिले आहे.
ज्या प्रकारे मागील काही दिवसांपासून काही लोकांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. त्यांच्यासाठी ‘हा’ शब्द योग्यच आहे. राष्ट्रभाषेचे काही शब्दकोश उघडुन पाहिले तर मी वापरलेला शब्द असंसदीय नाही. मी वापरलेल्या शब्दाचा अर्थ अनेक ठिकाणी मूर्ख, पढत मूर्ख, शतमूर्ख असाच आहे. माझे गुरू बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द भांडार मला माहिती आहे. मला सोपे बोलण्याची सवय आहे. मी वापरलेला शब्द सोपा असल्याचे सांगून या शब्दामुळे त्यांना समजेल की आपण काय आहोत असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
भाजप सुशिक्षित लोकांचा पक्ष आहे. मी वापरलेला शब्द उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनेकवेळा वापरला आहे. त्यांचे मी पंधरा ट्विट दाखवेल. त्यांनी हा शब्द वेगवेगळ्या प्रकारे वापरलेला आहे. तेथील ग्रामीण भागातील हा शब्द असल्यामुळे उत्तर प्रदेशातील अनेक नेते हा शब्द वापरत असतात. मी दिल्लीत शब्द वापरला आहे. महाराष्ट्रात असतो तर कदाचित वापरला नसता. शब्द योग्यच आहे. कुणाला काही तक्रार करायच्या असतील तर कराव्यात. माझी काही अडचण नाही, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.