
खटाव : प्रतिनिधी
खटाव परिसरात बुधवारी रात्रभर झालेल्या पावसाने मेघलदरेवाडी येथील मेंढपाळ कुमार बाबा मदने यांच्या लहान मोठ्या अशा एकूण १५ शेळ्या-मेंढ्या थंडीने गारठून जागीच ठार झाल्याची घटना घडली. नुकताच कोरोनाच्या सावटाखाली असलेला बळीराजा कात टाकून पूर्वस्थितीत यायचा प्रयत्न करत आहे. पण निसर्ग त्याची पुन्हा पुन्हा परीक्षा पाहत आहे. दरम्यान, या पशुपालकांना प्रशासनाने तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
खटाव तालुक्यातील मेघलदरेवाडी येथील मेंढपाळ कुमार बाबा मदने यांनी नेहमीप्रमाणे बुधवारी सायंकाळी डोंगरातून शेळ्यामेंढ्या चारून आणून घराशेजारील अंगणात बांधल्या होत्या. दरम्यान, रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली. पाऊस एवढा प्रचंड होता, की कोणी सहजासहजी घराबाहेर पडूच शकत नव्हते, तरीही जीव धोक्यात घालून जवळपास मिळेल तिथं शेळ्या-मेंढ्या सुरक्षित स्थळी हलवण्याचा प्रयत्न या कुटुंबीयांनी केला. तोपर्यंत पावसाच्या तडाख्याने शेळ्यामेंढ्या गारठल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे मदने यांनी सांगितले.
रात्रभर पडलेल्या या अवकाळी पावसामुळे ओढ्या-नाल्यांना पूर आला आहे. उभ्या पिकांमध्ये पाणी साचले असून काही पिके पावसाच्या तडाख्यात आडवी झाली आहेत. ‘धान माझं सालभराचं या पावसानं नेलं…’ अशी भावना शेतकऱ्यांच्या मनात आहे. या अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानीची भरपाई मिळेल का याच चिंतेने शेतकरी धास्तावले आहेत.