Site icon Aapli Baramati News

कोल्हापूर : लक्षवेधी लढत; सतेज पाटील यांच्याविरोधात भाजपकडून अमल महाडिक यांना उमेदवारी

ह्याचा प्रसार करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर विधानपरिषदेच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या विरोधात उमेदवार कोण याबद्दल उत्सुकता लागली होती. अखेर आज भाजपाकडून माजी आमदार अमल महाडिक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सतेज पाटील आणि अमल महाडीक यांच्यात होणारी ही लढत लक्षवेधी ठरणार आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील यांच्या निवासस्थानी भाजप कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर अमल महाडिक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अमल महाडिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 

सतेज पाटील यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आहे. गोकुळ दूध संघामध्येही काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने पाटील यांचे पारडे जड मानले जाते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अमल  महाडिक यांनी सतेज पाटील यांना पराभूत केले होते. नंतर काही दिवसांमध्येच सतेज पाटील यांनी अमल महाडिक यांचे वडील माजी आमदार महादेवराव महाडिक यांना पराभूत केले होते.

महाडिक घराण्याचे कोल्हापूरच्या राजकारणामध्ये मोठे  प्रस्थ आहे. सतेज पाटील यांच्या विरोधात महाडिकच  पर्याय असल्याने अमल महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. सतेज  पाटील यांना विधान परिषदेची निवडणूक आपले मंत्रिपद कायम राखण्यासाठी जिंकणे आवश्यक आहे. त्याचवेळी अमल महाडिक यांच्यासाठी वडिलांच्या पराभवाचे उट्टे भरून काढण्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version