पुणे : प्रतिनिधी
प्रेरणा सेवा ट्रस्टच्यावतीने येथील भवानी पेठेतील कै. चंदुमामा सोनवणे प्रसुतीगृह येथे मोफत जेवण, चहा-बिस्कीट वितरण सेवेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी प्रेरणा सेवा ट्रस्टचे अध्यक्ष बलवीर सिंग छाबडा, नगरसेवक बाबुराव चांदेरे, माजी महापौर प्रशांत जगताप, सदानंद शेटटी यांच्यासह मनपा आयुक्त विक्रमकुमार, उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आपण सर्वच गेल्या दिड वर्षापासून कोरोनाचा सामना करत आहोत. कोरोनाच्या संकटकाळात अनेकांचे मदतीचे,मायेचे हात पुढे आल्यामुळे आपण कोरोनाचा यशस्वी सामना करू शकलो. कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही, तिस-या लाटेचा धोका वर्तविण्यात आला आहे, अशावेळी सामाजिक संस्था कायम मदतीसाठी कायम पुढे आल्या आहेत.
प्रेरणा सेवा ट्रस्टने माणुसकीच्या भावनेतून हा उपक्रम सुरू केला, प्रेरणा ट्रस्टचा हा उपक्रम अनेक गरजूंसाठी आधार ठरेल, असा उल्लेखही उपमुख्यमंत्री पवार यांनी केला. आभार प्रेरणा ट्रस्टचे सतिष मिश्रा यांनी मानले.
प्रेरणा सेवा ट्रस्टचे अध्यक्ष बलवीर सिंग छाबडा यांनी प्रेरणा प्रेरणा सेवा ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. यावेळी नागरिकांसह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.