Site icon Aapli Baramati News

केवळ मुस्लिम असल्यानेच नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप : संजय राऊत यांचे वक्तव्य

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

आर्यन खान प्रकरणावरून सध्या राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या प्रकरणावर दररोज नवनवीन वक्तव्य होत आहेत. अशातच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक केवळ मुस्लिम असल्याने त्यांच्यावर गंभीर आरोप होत असल्याचे विधान केले आहे. आर्यन खान प्रकरणावर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी राऊत यांनी भाजपवर चांगलाच हल्लाबोल चढवला आहे.

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक सातत्याने एनसीबीच्या  कारभारावर पुराव्यासहित प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. आतापर्यंत  मालिकांनी केलेले सर्व आरोप हवेतील गोळीबार नव्हते. राज्य मंत्रिमंडळाने त्यांच्या मागे ठामपणे उभं राहायला हवं. एनसीबी अधिकाऱ्यांचे कालपासून काही पुरावे समोर आले आहेत. पैशांची देवाण-घेवाण झाल्याची शंकाही त्यांनी उपस्थित केली. 

काही लोकांनी अंमली पदार्थाच्या निमित्तानं महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी सुपारी घेतली आहे. याबाबत दोन व्हिडिओ समोर येत हे सिद्ध झाले आहे. एनसीबी झोनचे डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आर्यन खान याला जेलमधून बाहेर काढण्यासाठी शाहरुख खानकडून २५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. यामधील ८ कोटी रुपये समीर वानखडेला मिळणार आहेत, असा खळबळजनक दावा व्हिडिओमधून करण्यात आला आहे. हे प्रकरण साधे नसून गंभीर आहे.या प्रकरणी सरकारने न्यायालयीन चौकशी करायला हवी, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

देशाला समजायला हवं की मुंबईमध्ये  एनसीबीसारख्या राष्ट्रीय तपास यंत्रणासुद्धा कोणाच्या तरी दबावाखाली येऊन काम करतात. हे राज्याला बदनाम करत असल्याचेही राऊत यांनी नमूद केले. 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version