Site icon Aapli Baramati News

केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून दाखवल्या जाणाऱ्या भितीला महाविकास आघाडी सरकार घाबरत नाही : शरद पवार

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

मागील दोन वर्षात भाजपाचे महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचे प्रयत्न फसले आहेत. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केले जात आहे आणि भीती दाखवण्याचे काम चालू असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. या भितीला आम्ही घाबरत नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले. 

बुधवारी मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर होऊ शकत नाही. हे सरकार त्यांना पडू शकत नाही. हे सरकार पाच वर्षे टिकणार आहे. त्यामुळेच भाजपा सक्तवसुली संचालनालय, केंद्रीय अन्वेषण विभाग, प्राप्तिकर विभाग यांसारख्या केंद्र यंत्रणेचा वापर करून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर चौकशीचे ससेमिरा मागे लागत आहे. अजित पवार यांच्या तीन बहिणींवर प्राप्तीकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली. मात्र आम्ही अशा कारवायांना घाबरत नाही, असेही शरद पवार यांनी नमूद केले.

केंद्रातील भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. मात्र आम्ही त्यांना डगमगत नाहीत. फक्त मंत्र्यांना काळजी घेण्याचे सांगितले आहे, असे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी पवार यांनी फडणवीस यांच्या ‘आजही मला मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते’ या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मी चार वेळा राज्याचा मुख्यमंत्री होतो. मात्र मला कधीच मुख्यमंत्रीपदाची आठवण होत नाही. त्यांनी पाच वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. मात्र त्यांना विस्मरण होत नसेल. 

देवेंद्र फडणवीस यांनी मावळ गोळीबारावर पवार यांच्यावर टीका केली होती. मावळमधील गोळीबार पोलिसांकडून करण्यात आला होता. मात्र लखीमपूर हिंसाचाराच्या घटनेत केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाकडून शेतकर्‍यांच्या अंगावर गाड्या घालण्यात आल्याचा आरोप आहे व त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली असल्याचे सांगून पवार यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version